शिवचरणस्पर्श
आमच्या विषयी

महाराष्ट्राची भूमी म्हणजे शूरवीरांची गडकिल्यांची भूमी.
स्वराज्य उभारणीत महाराष्ट्राच्या किल्ल्यांचे योगदान इतिहासाच्या पानोपानी आपणास वाचायला मिळते. मराठी बाणा, अस्सल ग्रामीण बाज व बोलण्या चालण्यातील कमालीचा रांगडेपणा हे आजच्या या विज्ञान युगात दुर्मिळ होत चाललेले गुण आपणास आजही गड किल्यांच्या भटकंतीत जागोजागी अनुभवास येतात.

हिरवागार टवटवीत निसर्ग, घनदाट अभयारण्य, संपन्न पशुपक्षी व वन्यप्राणी जीवन, परंपरेने जपल्या गेलेल्या देवराया, वळणावळणाने वाहणारी लोभसवाणी नदी पात्रे, प्राचीन लेणी व गुंफा, इतिहास काळातील दुर्गम घाटमार्ग, लाल मातीच्या सुंदर पायवाटा , ऐतिहासिक महत्व असलेले गडकोट किल्ले, दिमाखदार नक्षीकाम केलेली जुनी मंदिरे व स्वराज्याच्या कामी आलेल्या ज्ञात-अज्ञात वीरांच्या समाध्या अशा एक ना अनेक गोष्टींनी महाराष्ट्राचा परिसर नटला आहे.

आजच्या तरुण पिढीच्या मनात आपल्या इतिहासाबद्दलचे प्रेम वाढते आहे, हे फार चांगले लक्षण आहे. शेकडो तरुण-तरुणी सह्याद्रीत भटकंती करत गडकोटांवर जाऊन येतात. पण त्यात निसर्गसौंदर्याचा आस्वाद, मौजमजा याला प्राधान्य असते. गडकोटांवरील स्थळांची, वास्तूंची, वाटांची, बुरजांची माहिती जाणून घेऊन भटकंती करणारे फार कमी लोक असतात, त्यातही अभ्यास करणारे त्याहून कमी असतात, अश्या रसिक अन दुर्गवेड्या तरुणांसाठी शिवचरणस्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट घेऊन येत आहे भटकंती मोहीम.

छ. शिवरायांनी रयतेसाठी उभे आयुष्य खर्ची घातले …आणि स्वतःचे साम्राज्य उभे केले…आज वेळ आली आहे की आपणसुद्धा या सामाजिक कार्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याची.
चला तर मग एक उपक्रम हाती घेऊया राजांचा एक सच्या मावळा – शिवभक्त …!!!

|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||